नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह

नाशिकच्या कोरोना कक्षातील पाचवा संशयितही निगेटिव्ह

नाशिक : न्यूझीलंडमधून परतलेल्या 67 वर्षीय वृद्धाचा कोरोना विषाणूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्हा रुग्णालयात परदेशातून आलेल्या पाचही रुग्णांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहर-जिल्ह्यात 22 जणांची आरोग्य विभागातर्फे नियमित तपासणी केली जात आहे. दरम्यान, खासदार डॉ. भारती पवार यांनी सोमवारी (ता. 9) जिल्हा रुग्णालयास भेट दिली. या वेळी त्यांनी कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत सूचनाही केल्या. 

...अन् त्याचा अहवाल निगेटिव्ह

गेल्या 29 फेब्रुवारीला न्यूझीलंडहून संबंधित वृद्ध नाशिकमध्ये आले होते. त्यांना शनिवारी (ता.7) दम्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात व त्यानंतर रविवारी (ता. 8) सकाळी जिल्हा रुग्णालयातील कोरोना विषाणू विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्या स्वॅबचे नमुने तत्काळ पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असता, सोमवारी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोना विशेष कक्षात दाखल झालेले ते पाचवे रुग्ण असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. या पाचही रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, शहर-जिल्ह्यात परदेशातून 22 जण आले होते. त्यापैकी 19 जणांची आरोग्य विभागाकडून दिवसातून दोन वेळा तपासणी केली जात आहे. तर तिघांवर 14 दिवस उपचार करण्यात आले आहेत. 

खासदार डॉ. भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयास भेट
दरम्यान, सोमवारी सायंकाळी खासदार डॉ. भारती पवार यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देत कोरोनासंदर्भात राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. खासदार डॉ. पवार यांनी या वेळी विशेष पथक तयार करून मास्कची साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच, नागरिकांमध्ये कोरोनाची भीती पसरू नये म्हणून जनजागृतीच्या माध्यमातून संदेशाचा प्रसार करण्याच्या सूचना केल्या.  

भारतात आणखी 2 राज्यांमध्ये पोहोचला व्हायरस

भारतात कोरोनाव्हायरसचाधोका वाढला असून आणखी 2 राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूत एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातील हा पहिला रुग्ण आहे.तर पंजाबमध्येही कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला आहे. पंजाबचे मुख्य सचिव (आरोग्य) अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं की, 'एअर इंडियाच्या विमानानं हा कोरोनाग्रस्त रुग्ण इटलीच्या मिलानहून भारतात आला. कुटुंबातील अन्य 2 व्यक्तींसह हा रुग्ण 4 मार्चला अमृतसर विमानतळावर पोहोचला. तपासणीत त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं स्पष्ट झालं. 

Web Title: The fifth suspect of Corona was also negative Nashik 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com